जगातील प्रत्येकाची मंगल कामना करण्याचा विचार करणे, ही देखील शिवभक्ती असल्याचे पूज्य गिरी बापूजी यांचे विचार

*महात्मा गांधी जयंती निमित्ताने श्रम करणाऱ्या व्यक्तीचा आज सभास्थळी गौरव करण्याचा आयोजक अनुप भैय्या अग्रवाल यांचा मनोदय*

धुळे प्रतिनिधी

 

तन आणि मन समर्पित करून केलेल्या शिव पूजेचे पुण्य मोठे आहे. विचार आणि प्रवृत्ती मध्ये शुभ भाव असला पाहिजे. प्रत्येकाची मंगल कामना करणे, हा विचार देखील शिवभक्ती आहे. मंदिरात पूजा हवन करून तर शिव प्रसन्न होतोच. पण किर्तन आणि प्रवचनातून भगवान शंकराची स्तुती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे पुण्य हे सर्वात मोठे असून या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून हे पुण्य प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम अग्रवाल परिवाराने केले असल्याचे विचार आज पूज्य गिरी बापूजी यांनी प्रवचनाचे दुसरे पुष्प गुंफतांना केले.

 

धुळ्यातील खानदेश गो शाळेच्या मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून शिव महापुराण कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचा आज दुसरा दिवस होता. यावेळी पूज्य गुरुजी यांनी शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून महर्षी वेद व्यास यांनी भगवान महादेवाचे केलेले वर्णन मांडले. भगवान महादेवाच्या या कथेचे प्रत्येकाने भक्तीने श्रवण केले पाहिजे. महादेवाचे केवळ स्मरण केल्याने देखील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते .या कथेचा महिमा फार मोठा आहे .भगवान शंकराची पूजा करण्यासंदर्भात तन आणि मन एकाग्र झाले पाहिजे. शिवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या प्रवृत्ती मध्ये शिवभाव येणे आवश्यक आहे .पूजन आणि मनन करत असताना या जगातील प्रत्येक व्यक्तीचे चांगले झाले पाहिजे, अशी भावना मनात येणे ही खरी शिवभक्ती आहे .शिव आणि पार्वती या जगताच्या माता आणि पिता आहेत. शरीराचे माता पिता बदलत असतात. कर्मबंधन भोगण्यासाठी माणसाला जन्म घ्यावा लागतो. कर्म बंधनापासून देखील शिव साधना केल्याने मुक्ती मिळते.

आज समाजामध्ये चमत्कार करण्याच्या प्रवृत्तीलाच सिद्धी म्हटले जाते. मात्र बुद्धीची पवित्रता होणे म्हणजे खऱ्या अर्थाने सिद्धी असल्याचे त्यांनी सांगितले. आज भारत हा सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे. सध्या अमेरिका आणि कॅनडा येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र विकासात भारत हा डॉलरची बरोबरी करण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. असे झाल्याने आपल्या देशातून विदेशात पर्यटनाला कोणीही जाणार नाही. भारत हे तीर्थस्थान आहे. भारतात तीर्थयात्रेला महत्त्व आहे. त्यामुळे भविष्यात भारतातील नागरिक पर्यटना ऐवजी तीर्थयात्रेला महत्त्व देणार आहे. भगवान शंकराची संबंधित प्रत्येक गोष्ट मोठी आहे. त्यामुळेच शिवपुजेला महापूजा, आरतीला महाआरती, प्रसादाला महाप्रसाद असे म्हटले गेले आहे .त्यामुळे प्रत्येकाने या महापूजेच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीकडे गेले पाहिजे,असे आवाहन पूज्य बापूजी यांनी केले. पाप म्हणजे नकारात्मक विचारधारा आहे. दुसऱ्यांचं वाईट करणे, हा स्वभाव वाईटच आहे. आज मनुष्य घर, कपडे ,दागिने, बदलतो .मात्र त्याचा स्वभाव बदलत नाही. दुसऱ्याचे वाईट करण्याच्या या स्वभावामुळे स्वतःचे देखील वाईट करून घेतो. पण शिव कथेचे श्रवण करून या विचारांमध्ये परिवर्तन करणे शक्य आहे. त्यामुळे शिव कथेचे स्मरण केले पाहिजे. शिव कथा ऐकल्याने यज्ञ केल्याचे पुण्य तसेच बारा वर्षे तपस्या केल्याचे पुण्य मिळते .त्यातच श्राद्ध दिवसात या कथेचे श्रवण करणे म्हणजे हजारो पितरांना तर्पण केल्याचे पुण्य आहे, असे ते म्हणाले. भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी शिवालयात गेल्यानंतर मौन धारण करून साधना केली पाहिजे. मौन धारण करून केलेल्या साधनेचे पुण्य हे सर्वात मोठे असते .काही लोक घरातील कलह शांत करण्याचे उपाय बाहेर शोधत फिरतात. मात्र घरातील कलह शांत करण्यासाठी मौन राहणे गरजेचे आहे. मौन राहिल्याने खऱ्या अर्थाने मनाची शांती प्राप्त होते असेही त्यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमात नंदुरबार येथील डॉक्टर भूषण कुमार अग्रवाल यांनी भोजन करण्याचा शास्त्रोक्त विधी सांगितला. भोजन हे एकांतात केले पाहिजे .तसेच भोजन करीत असताना परमेश्वराचे ध्यान केल्याने त्यातील दोष निघून जातात ,असे सांगितले. तसेच दिनचर्या सांगताना त्यांनी आरोग्याचे अनेक सल्ले दिले.

 

आज कथेचे विवेचन करीत असताना पूज्य बापूजी यांनी लोकसेवा ही देवसेवा असल्याचे सांगितले. यावर आयोजक अनुप भैय्या अग्रवाल यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमाची साधना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे .त्यामुळेच महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज 2 ऑक्टोंबर रोजी सभेच्या ठिकाणी श्रम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक शितलकुमार नवले, नगरसेवक प्रदीप करपे ,भारतीय जनता पार्टीचे धुळे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच अग्रवाल परिवाराच्या वतीने महाआरती करण्यात आली.

Leave a Comment